संतोष देशमुख प्रकरण: संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड अडचणीत. विष्णू चाटेचा आवाज नमुना पोलिसांनी घेतला. आवादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप.
बीड: संतोष देशमुख हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचा संशय असलेल्या वाल्मिक कराड यांच्याविरोधातील चौकशीची घेराबंदी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल नसला तरी खंडणी प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
वाल्मिक कराडने आरोपी विष्णू चाटे याच्या माध्यमातून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. नंतर विष्णू चाटेनेच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराड यांच्याकडे नेले होते, असा आरोप आहे. या अनुषंगाने पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटे याचे आवाज नमुने गोळा केले आहेत.
विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्याचाही तपास सुरू आहे. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचेही आवाज नमुने तपासले जाणार आहेत. मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मागितलेल्या खंडणीच्या संदर्भातील संवाद उघडकीस येण्यासाठी या नमुन्यांची तुलना केली जाणार आहे.
दरम्यान, पवनचक्की मालकांना खंडणीच्या धमक्यांबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच हा फोन करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली.
सीआयडीकडून वायबसे दाम्पत्याची नव्याने चौकशी:
संतोष देशमुख हत्याकांडातील वायबसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. यापूर्वीही संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसे यांची चौकशी करण्यात आली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. अद्याप फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेच्या संदर्भात वायबसे दाम्पत्याची माहिती महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्या तपासातही वायबसे दाम्पत्याने दिलेल्या माहितीची भूमिका महत्त्वाची ठरली होती.